मजकुराकडे जा
100%

श्री विठ्ठलाची आरती

युगे अठ्ठावीस

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ धृ ॥

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥ २ ॥

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळू आरत्या विठोबा सावळा ॥ ३ ॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ।
चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ ४ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥ ५ ॥