श्री सद्गुरुंची आरती
धन्य धन्य हे प्रदक्षिणा
धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची ।
झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ॥ धृ ॥
पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी ।
सर्वही तीर्थे घडलीं आम्हा आदिकरुनि काशी ॥ १ ॥
मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती ।
नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ॥ २ ॥
कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत ।
लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥ ३ ॥
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमांसी ।
अनुभव ते जाणती जे गुरुपदिंचे रहिवासी ॥ ४ ॥
प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला ।
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ॥ ५ ॥